Saturday, 2 March 2019

महाबळेश्वरच्या मधोत्पादक केंद्राला भेट दिलीत?



महाबळेश्वर येथे मधोत्पादन कसे केले जाते?

महाबळेश्वरची थंड हवेचे ठिकाण म्हणून मोठी खासियत आहे. ती सगळ्यांना माहीतच आहे. परंतु स्ट्रॉबेरीसाठी आणि त्याउपर वेगवेगळ्या फ्लेवरच्या मधासाठी  महाबळेश्वर खूप प्रसिद्ध आहे. बाभूळ, कारवी, जांभूळ, लिंब असे विविध प्रकारचे मध या भागात बघायला मिळतात. अशाच एका सहकार तत्वावर चालणाऱ्या महाबळेश्वर येथील मधोत्पादक केंद्राला भेट दिली. तेथील विक्री विभागातील अरुण यादव यांनी दिलेली माहिती.


मधमाशांची पेटी -
एका पेटीमध्ये फक्त एकच राणीमाशी आढळते. सहा ते सात पोळे एका पेटीमध्ये असतात. ती माशी कुत्रीम पद्धतीने तयार केलेल्या पेटीतील पोळ्यात अंडी घालते. इतर माशा या फुलांचे परागकण शोषतात आणि मधाच्या स्वरूपात पेटीमध्ये जमा करतात. या माशा फक्त कार्य करतात. त्यांची प्रजननाची क्षमता नसते. राणीमाशी ही प्रजननासाठी जंगलामध्ये जाते. तिचा प्रजननाचा कालावधी ५ ते ६ दिवसांचा असतो. त्यानंतर नराला इतर मधमाशा मारून टाकतात. मधमाशांमधील नर(ड्रोन) फक्त प्रजननाचे काम करतात. मध गोळा करत नाहीत तर फक्त खाण्याचे काम करतात. त्यानंतर  अंडी घातली जातात आणि काही दिवसांनी मधाचे पोळे भरू लागते. त्यातील मध हा मशीनद्वारे शास्त्रशुद्ध पद्धतीने काढून घेतला जातो; अशा मधाला 'सुपर मध' म्हणतात.

मधूसागर : मधोत्पादक केंद्र
मधोत्पादक  केंद्राबद्दल -
महाबळेश्वर मधोत्पादक सहकारी केंद्रामध्ये दोन हजार सभासद  आहे. त्यांच्याकडे प्रत्येकी ५० ते २०० मधमाशांच्या पेट्या
दिल्या जातात. ऑक्टोबरपासून वेगवेगळ्या मधमाशांच्या जातीचा सिझन चालू होतो. मग कुणी जंगलामध्ये पेट्या ठेवते तर कुणी घरीच ठेवते. तसेच झाडाच्या डोलीला असलेले मोहोळाकडे सुद्धा लक्ष दिले जाते. यातून  मिळणाऱ्या मधाला प्रतिकिलो ४०० रुपयांपर्यंत दर मिळतो. या प्रकल्पाअंतर्गत वर्षाकाठी ५० ते ६० टन मध मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मधुमक्षिकापालन हा व्यवसाय म्हणून खूप चांगला आहे. पोळ्याचा वापर हा दोन ते तीन वर्षे करता येतो. साधारणतः एक पेटीमधून आठवड्यात २ ते ३ किलो मध मिळतो. अशी माहिती मधूसागर प्रकल्पाचे विक्री अधिकारी अरुण यादव यांनी दिली.


आपल्या घरी मधाची गुणवत्ता कशी ओळखाल?
सुरुवातीला एक भांडे घ्यावे. त्या भांड्यात पाणी ओतून पूर्ण भरून घ्यावे. नंतर त्या भांड्यात हळूहळू मध टाकावा व निरीक्षण करावे. पूर्ण मध जर भांड्याच्या बुडात साचलेला असेल तर तो मध १००% गुणवत्तापूर्ण मध आहे. असे समजावे. तसे न होता जर मध पाण्यावर तरंगू लागला आणि तो पाण्यात एकजीव झाला तर, समजावे आपल्याकडील मध भेसळयुक्त आहे. 

राणीमाशी कशी ओळखाल?
राणीमाशी ही आकाराने मोठी असते. ती पेटीच्या बाहेर  येत नाही(अपवाद : प्रजननाचा कालावधी).
राणीमाशी काम करणाऱ्या माशांपेक्षा मोठी असते.

रॉयल जेलीचे(मध) सेवन केल्याने काय होते?

रॉयल जेलीचे सेवन केल्याने, ५० वर्ष वय असलेली व्यक्ती ३० वर्ष वय असल्यासारखे दिसायला लागते. आशाप्रकारचा मध फक्त स्वित्झर्लंड देशात मिळतो. मधाचा दर तब्बल ५० हजार रु प्रतिकिलो एवढा आहे.

पोळ्यातून शुद्ध मध बाहेर कसा केला जातो?

१)कच्चा मध गोळा केला जातो आणि तो मध पहिल्या क्रमांकाच्या  स्टीलच्या कॅनमध्ये ओतला जातो.
२)स्टीलच्या कॅनला पाईपाद्वारे डबल कॅटल असलेल्या 'स्टीम बॉयलरला' जोडलेले असते. आत आणि बाहेर असे दोन कॅटल असतात. पहिल्या कॅटलमध्ये कॅनमधील मध सोडला जातो व बाहेरील कॅटलमध्ये फक्त गरम पाणी असते. पाण्याला ४५℃ पर्यंत तापवले जाते. आणि मध गरम केला जातो.
३)हानी फिल्टर्समधून फक्त मध बाहेर येतो. कचरा आणि इतर टाकाऊ गोष्टी खालच्या बाजूला साचल्या जातात. हा गरम मध १२ तास थंड होण्यासाठी ठेवला जातो (नैसर्गिकरित्या थंड केला जातो). ज्याप्रकारे  गरम केलेल्या दुधावर साई येते. तशाच प्रकारे मधावर 'फम' तयार होतो. त्याचा वापर मधमाशांच्या खाद्यासाठी केला जातो.
४)प्रत्येक पॉइंटला पांढऱ्या कापडाने मध गाळून घेतला जातो.
५)शेवटी १००, २५०, ५००, १००० ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये मध पॅक केला जातो.


Friday, 1 March 2019

भिलार एक पुस्तकांचं गाव

भिलार : पुस्तकांचं गाव

भटकंती| अजूनही अशी कित्येक खेडे-पाडे आहेत की, जिथं वर्तमानपत्रेसुद्धा पोहचलेले नाहीत. प्रत्येक गावात वाचनालयाची तर बातच नको. अशी अवस्था आहे महाराष्ट्रातील गावांची... त्यातच आता महाराष्ट्र सरकारने भिलार या गावाला पूर्ण पुस्तकमय करून टाकलंय! या मोठ्या पावलाबद्दल सरकार अभिनंदनास पात्र आहे.

भिलार हे महाराष्ट्रातील सातारा जिह्यातील गाव. महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणापासून ८ किमी अंतरावर असलेले हे गाव. अडीच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भिलारमध्ये जवळपास ९०℅ स्ट्रॉबेरीची शेती केली जाते. 

तसं भिलारला ऐतिहासिक आठवण आहे, महात्मा गांधी ज्यावेळी पाचगणीला भेट देण्यासाठी आले त्यावेळी भिलारे गुरुजी यांनी गांधींवर होणार हल्ला परतवून लावला आणि त्यांचा प्राण वाचवला. दोन वर्षांपूर्वी भिलारे गुरुजींचे निधन झाले. गावात गुरुजींचे घर पाहायला मिळते. घरातील भिंतीवर गुरुजींचा हार घातलेला फोटो पाहायला मिळाला. राज्यशासनाने गावाच्या प्रकल्पासाठी इतका मोठा खर्च केला असताना भिलारे गुरुजींचे साधे एक स्मारक उभारलेले नाही ही मोठी खंत वाटते. 

ब्रिटनमधील हे-ओन-वे हे गाव जगातील पाहिले पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते. तशीच संकल्पना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भिलार या गावी राबवली. त्यानंतर भारतातील पाहिले पुस्तकांचं गाव म्हणून भिलार ओळखू लागले.

पुल देशपांडे
बालसाहित्य, कादंबरी, विनोदी पुस्तके, चरित्रे, आत्मचरित्रे, दिवाळी अंक, नियतकालिके, पर्यावरण विषयक पुस्तके, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, इतिहास, कथा, कला, चित्रमय पुस्तके असे विविध प्रकारचे साहित्य वाचायला आणि पाहायला मिळते. गावातील रस्त्यालगत आणि गल्ली बोळानी असलेल्या ३० घरात वाचनालयाचे ३० वेगवेगळे विभाग आहेत. पण अशावेळी प्रश्न पडतो की, हे लोक आपल्या घरात पुस्तके ठेवण्यासाठी तयार कसे झाले असावेत? या प्रश्नाचं उत्तर ग्रंथालयांची देखरेख आणि हिशोब ठेवणाऱ्या समन्वयकांनी संगीतले; ते म्हणाले गावातील दोन व्यक्ती एक म्हणजे प्रवीण भिलारे आणि दुसरे शशिकांत भिलारे या व्यक्तिंनी पुढाकार घेऊन हा उपक्रम लोकांना समजून सांगितला त्यांच्यात जागरूकता निर्माण केली आणि लोकांकडून परवानगी घेतली. आणि मगच हा उपक्रम साकारला गेला. म्हणून हे श्रेय या दोन व्यक्तीकडे जाते.
कथा : विभाग
     महाबळेश्वरच्या कुशीत वसलेल्या भिलारमध्ये सुरुवातीला प्रवेश करताना 'भिलार : पुस्तकांचं गाव' अशा नावाची मोठी कमान लागते. आणि पुढे आल्यानंतर 'पुस्तकांचे गाव’ प्रकल्पाचे मुख्य कार्यालय आहे. त्याठिकाणी उपक्रमावर आधारित एक चित्रफीत दाखवली जाते आणि नकाशा दिला जातो. सुरुवातीला चित्रफीत पाहिल्याने वेगवेगळे विभाग पाहण्याची खूप उत्सुकता असते. वाचकांसाठी ग्रंथालयात सुसज्ज अशी बैठक व्यवस्था केली आहे. सोफा, खुर्च्या, टेबल, फिरते कपाट आणि त्यात पुस्तके... तसेच त्या खोली मध्ये पितळी हंड्यामध्ये पिण्याच्या पाण्याचीही सुविधा आहे. वाचक बिंधास्तपणे दिवसभर म्हटलं तरी तेथील पुस्तक घेऊन तिथंच वाचत बसू शकतो. पुण्याच्या ठिकाणी पैसे भरून अभ्यासिका जॉईन करण्यापेक्षा हा पर्याय कितीतरी उत्तम! आणि विशेष म्हणजे तेथील पुस्तके तुम्ही बाहेरही वाचायला घेऊन जाऊ शकता; पण अट एवढीच की, ते पुस्तक परत आणून त्याठिकानीच ठेवायचे. जवळपास अशाच प्रकारची व्यवस्था तिसही विभागाला आहे. वाचनाचा छंद असणाऱ्यांची तलफ भागेल अशा प्रकारचं हे सगळं आहे.

स्ट्रॉबेरी

वेगवेगळ्या ठिकाणी भेट देताना वाटेत, स्ट्रॉबेरीची शेती पाहायला मिळते. एका मालकाने सांगितलेल्या माहितीप्रमाणे एकरी वर्षाला एक लाख रुपयांचे स्ट्रॉबेरीतुन उत्पन्न मिळते. आज इतर शेतकऱ्यांची अवस्था पाहता तेथील शेतकऱ्यांसाठी ही खूपच दिलासादायक बाब आहे. जवळपास ६०० कुटुंब असलेल्या भिलारला स्ट्रॉबेरी आणि पर्यटन व्यवसायाने जगवल आहे. 

तेथे जाऊन महिनाभर राहायचं असेल तर तशी सोय आहे. हॉटेल लॉजिंगपेक्षा लोकांनी भाड्यावर चालू केलेल्या लॉजिंगची सुंदर आहे. भिंतीवरील चित्रे, जागोजागी मराठीतून फलक, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रपुस्तिका, विनोदी पुस्तकांचा बालकही वाचनाचा आनंद घेतात. २५ हजारांपेक्षा जास्त पुस्तके असलेल्या भिलार गावात दिवसभर फिरता येईल, वाचता येईल आणि फुकट वेळ दवडला असं कधी वाटणार नाही. मन प्रसन्न आणि उत्साही तर नक्कीच राहते. तर निसर्गात आणि थंड हवेच्या ठिकाणी वसलेल्या टुमदार भिलारला एकदा अवश्य भेट द्या…
वाट