
गँगस ऑफ वासेपूर, गंगाजल अजून असे कित्येक चित्रपट तुम्ही पाहिले असतील. या चित्रपटांतून होणारी बिहारची ओळख तसेच नितीश कुमार, लालूप्रसाद यादव, जंगलराज असे शब्द कानावर पडले की, बिहार आठवतो. चित्रपट आणि राजकारणातून होणारी बिहारची ओळख तशी चांगली नसते. मारामाऱ्या, खून, गुन्हेगारी, कीडन्यापिंग, शिक्षणाचं प्रमाण कमी, असं सगळं बिहारला जाण्याआगोदर माझ्या मनात होतं. आमच्या १५ दिवसांच्या बिहार यात्रेनंतर बऱ्याच अंशी वरील मुद्दे स्पष्ट झाले होते. खून, गुन्हेगारी हीच बिहारची ओळख नसून बिहारबद्दल खूप काही चांगल्या गोष्टी आहेत. बाबू जगजीवनराम, संपूर्ण क्रांतीचा नारा देणारे लोकनायक जयप्रकाश नारायण, राष्ट्रकवी रामधरिसिंह दीनकर अशा महान व्यक्तींचा हा बिहार आहे. बिहारमध्ये खूप प्रेमळ माणसं भेटली, ज्यांनी घरी नेऊन चहापान केलं तर कुणी जेऊ घातलं. आपण बिहारच्या माणसांना एवढ्या शिव्या घालतो पण ते लोकं आपल्याबद्दल वाईट चिंतीत नाहीत. या बाबी तिथं बिहार फिरून आल्यावरच कळतील हे मात्र नक्की. बिहारला जाण्याचं कारण म्हणजे नुकतंच पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण झालं होतं. लोकसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले होते. माझा मित्र सचिन पांडुळे याच्याशी चर्चा करून बिहारमधील काही मतदारसंघात निवडणुका अनुभवायला जायचं ठरवलं. परिवर्तनवादी विचारांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाचा समाचार घेणारा तसेच बेरोजगारी, महिला सुरक्षा, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर परखडपणे सरकारला जाब विचारणारा आणि विद्यापीठात शिकत असताना राजकारणात गेलेल्या कन्हैया कुमारच्या उमेद्वारीमुळे प्रसिद्धीस आलेल्या बिहारच्या बेगुसराय मतदारसंघात जावं असं ठरवलं. रेल्वेची तिकिटं काढली आणि जाऊन पोहोचलो बेगुसरायला. हा मतदारसंघ गंगा नदीच्या किनारी पाटण्याच्या जवळ आहे. पंधरा दिवस या भागात मुक्काम ठोकल्यावर निवडणुकीबद्दलच नव्हे, तर इथल्या माणसांच्या जगण्याबद्दलही बरंच काही हाती लागलं. त्यातलं थोडं इथे...
बिहारमधील शिक्षणव्यवस्था -
 |
| मुसाहरी गावातील शाळा |
बिहार हे देशातील सर्वात कमी साक्षर असलेलं राज्य. यांची प्रचिती तेथील कुठल्याही शाळेत जाऊन विचारपूस करून आलं तरी कळेल. आम्ही एका शाळेत आणि कॉलेजात गेलो होतो. बेगूसराय जिल्ह्यातील 'मुसाहरी' नावाचं ते गाव. लांबलचक आयताकृती असलेली शाळेची इमारत होती. दोन मजल्यांच्या इमारतीत हायस्कुलपर्यंत वर्ग चालत होते. एका वर्गात गेलो आणि विद्यार्थ्यांना काही माहिती विचारली, तर समजलं इथ शिक्षक फार कमी असतात व जे आहेत ते वेळेवर येत नाहीत. मात्र, या विषयावर आम्ही मुद्दामहून शिक्षकांशी संवाद करणे टाळले. पर्मनंट होत नाही, पगारवाढ होत नाही अशी ओरड तिथंही होती.
जीडी महाविद्यालयातील प्रसंग -
 |
| जीडी महाविद्यालय, बेगूसराय |
बेगूसराय शहराच्या मध्यवर्तीभागात असलेले जीडी महाविद्यालय जिल्ह्यातील सर्वात मोठे शिक्षण केंद्र म्हणून नावारूपास आहे. बहुतेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या असल्याने महाविद्यालयात खूप काही गर्दी पाहायला मिळाली नाही. जी काही पोरं होती ती रणरणत्या उन्हात क्रिकेट खेळत होती. काहींच्या परीक्षा चालू होत्या तर काहींचा पेपर तासाभराने होणार होता. काही विद्यार्थी कुजबूजत इकडून तिकडे ये-जा करत होती. बराच वेळ आम्ही एका वडाच्या झाडाखाली पारावर निवांत क्रिकेटचा आनंद घेत बसलो होतो. पाणी पिण्यासाठी विश्रांती झाली तेव्हा त्या मुलांशी गप्पा झाल्या. एक विद्यार्थी सांगत होता, ‘मी बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे.’ शिक्षक, लेक्चर, कॉलेजची वेळ, प्लेसमेंट याबद्दल त्याला विचारले असता म्हणाला, ‘मी पहिल्या वर्षी बीकॉमला प्रवेश घेतला त्यावेळी कॉमर्स विभागात कुणीच पूर्णवेळ शिकवणारं नव्हत. असेच एक दोघेजण खाजगी कोचिंग क्लासेसवाले अकाउंट आणि इतर विषय शिकवायला येत असत. आता कुठे कॉमर्स विभागात दोन पूर्णवेळ प्राध्यापक असतात. तेही कंत्राटवर भरती केलेले.’ प्लेसमेंट ही भानगड तर महाविद्यालयालासुद्धा माहीत नसावी अशी परिस्थिती होती.
कन्हैय्या कुमार -
 |
| कन्हैया कुमार लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना |
'चुनावो के दिन नेता आते है और फीर मिलतेभी नही, सब नेतालोग एक जैसे है' कन्हैय्याचा प्रचार करणाऱ्या एका कार्यकर्त्याला महिला म्हणाली. लोकशाहीवरचा विश्वास कमी झाल्याचं हे उदाहरण म्हणता येईल! दिवसभरात मोठमोठ्या अशा ३० ते ३५ गावांमध्ये प्रचार केला जात होता. त्यात माहौल पाहुन कन्हैयाचे ४ ते ५ भाषणं होत असत. भाजपचे लोकसभेचे उमेद्वार गिरीराजसिंह आणि नरेंद्र मोदी यांच्या योजनांवर तो बोलत असे. तसेच 'लोकशाही' यावर प्रामुख्याने भर टाकत होता. लोकशाहीमधील लोकांचा सहभाग, स्थानिक मूलभूत मुद्दे तसेच मतदारसंघात विद्यापीठ, आयआयटी, एम्स किती महत्वाचं आहे आणि हे सगळं करणार असल्याचे सांगत होता. 'बेगूसरायचा भूमिपुत्र' या अस्मितेचा भाषणामध्ये बऱ्यापैकी उल्लेख करत होता. चांगला मुद्दा हा की, मला जाती धर्मावर मते देऊ नका. असं बिनदिक्कत म्हणत होता. यामुळच की काय कन्हैयाला पराभवाला सामोर जाव लागलं.
लोकांशी गाठी-भेटी घेणारा कन्हैय्या जेएनयूपेक्षा वेगळ्याच रुपात दिसला. नम्रपणे लोकांचा आशीर्वाद घेत होता. मागच्या उमेद्वाराने काम न केल्यामुळे एक आजीबाई कन्हैय्यालाच शिव्या घालत होती. आजीला नम्रपणे उत्तर देत कन्हैय्याने समजावून सांगितलं. तरुणांमध्ये क्रेझ असणाऱ्या कन्हैय्याला जुन्या मानसिकतेनं माञ नाकारलं! आणि पराभव स्वीकारावा लागला. परंतु बेगूसरायमधील जातीचे गड तोडण्याची मात्र सुरुवात झाली हे त्याला मिळालेल्या पावणे तीन लाख मतांवर आधारित म्हणता येईल. संपूर्ण बिहार आणि देशातचमच प्रस्थापितांना किंमत मोजावी लागली तर कन्हैयाचं काय?
शेतीचा हंगाम, पीक व आहार -
 |
| गव्हाच्या काढणीची लगबग |
रब्बी हंगाम चालू होता. गव्हाचा अन मक्याच्या कापणीचा तो काळ. उन्हाचे कवडसे पडण्याआगोदर शेतकरी शेतात जाऊन राबत होते. कुणी गहू कापत होतं तर कुणी गहू एकत्र करून दाणे बाजूला करण्यासाठीची तयारी करत होतं. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ४०° सेल्सिअस तापमान अन वातावरण खूपच दमट, घामाच्या नुसत्या धारा लागत असे. सकाळी लवकर उठून शेतात राबणारा शेतकरी सूर्य डोक्यावर येण्याआगोदर सगळं काम निपटून घरी परतत असे. आणि थंडगार हापश्याच्या (चापाकल) पाण्याने अंघोळ करून दही-चुरा खाऊन झोपत असे.

हे सुगीचे दिवस याच नित्यक्रमाणे पार पडत होते. बहरलेली आंबेराई व रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांमध्ये बहुतेक आंब्याची झाडे होती. आंब्याच्या वजनाने झाडाच्या फांद्या रस्त्यावर झोपावलेल्या दिसत होत्या. काळीशार मका दोन दोन कणसं घेऊन भक्कम उभा होती. तर तुरळक ठिकाणी ऊस बघायला मिळाला. शेती ही पारंपरिक पद्धतीनेच केली जाते. काही ठिकाणी तुषार सिंचनाचा वापर होताना दिसला. परंतु बऱ्यापैकी पिकांना पाणी देण्यासाठी पाट पद्धत वापरत होते. गंगा नदीच्या खोऱ्यामुळे तसेच मागील काही वर्षे कायम महापूर अशी एकंदरीत परिस्थिती असल्याने. माती तिची सुपीकता गमावून बसली आहे. शेतातील मातीवर दूरदूरपर्यंत पांढरा थर! साहजिकच त्याचा पीकांवर परिणाम दिसत होता. गव्हाची प्रत खालावलेली होती तर स्वस्त धान्य दुकानात चेंबलेला गहू मिळतो तसा गहू पीकत होता . बुढी गंडक (गंगा नदीची उपनदी) नदीवर गेलो असता तिथे काही शेतकरी नदीच्या कडेला उगलेली पांढरी रताळे खोदून काढत होती. सुरुवातीला हे रताळे आपोआप उगलेली आहेत की काय असा समज होता. परंतु नंतर कळलं की 'पांढरे रताळे' नावाचं पीक घेतलं होतं. खरीप हंगामात भात, मोहरी हे पीकं घेतले जातात. इथे कृषी उत्पन्न बाजार समिती असला काही प्रकारच पाहायला मिळाला नाही.
खानपान -
सकाळचा नाष्टा ताट भरून डाळ भात खायला मिळत होता व त्यासोबत अख्खी हिरवी मिरची खायला मिळे. सध्या फणस व आंब्याचे दिवस चालू आहेत. बिहारला गंगा नदी वरदान ठरलीय! तसेच गंडक, बुढी गंडक या उपनद्यासुद्धा आहेत. यामुळे आहारात भात व मासे खायला मिळतात. फणसाला बिहारमध्ये 'कटहल' म्हणतात. कच्चे फणस शिजवून काळ्या रष्यात भाजी बनवतात. ही भाजी आणि भात खाताना चिकन बिर्याणीसारखीच चव लागते. 'सत्तू' नावाचे थंडपेय बाराही महिने चालते. सत्तू हा भाजलेल्या हरभऱ्याच्या पिठापासून बनवतात. भाजलेले पीठ थंड पाण्यात टाकतात आणि जलजीरा, कांदा, मिरची व काळे मीठ टाकून मिश्रण बनवतात. मसाल्यामुळे खूप चविष्ट लागते. आपल्याइकडे चहा, सरबत, ताक अन इकडे पाहुणे आले तर पाहुण्यांना पण 'सत्तू' देतात. सत्तू विकणारा दुकानदार सांगत होता पिल्याने पोट थंड राहते, भूकही लागत नाही. व फिटनेसही टिकून राहतो.

दही-चुरा हा आमच्यासाठी खूप आगळा वेगळा पदार्थ होता. एखाद्या घरी आम्हाला जरुर खायला मिळत असे. एका भल्या मोठ्या जेवणावळीमध्ये आम्हाला ही संधी मिळाली. दही, चुरा(कच्चे पोहे), थंड पाणी, साखर आणि बटाटा मसाला याला एकत्रित दही-चुरा म्हणतात. प्रथम कस खायचं इथपासून सुरुवात झाली होती. त्यानंतर शेजारी बसलेला तरुण कस खातोय ते कॉपी करून खायचं शिकून घेतल. ताटामध्ये कच्चे पोहे पसरवले जातात. त्यावर थंडपाणी शिंपडून ते ओले केले जातात. व त्यावर थंडगार डेऱ्यातील दही घेऊन साखर टाकली. हा पदार्थ आमच्यासाठी नवीनच होता. पण खूप चविष्ट व सुंदर होता.
 |
| दहीचुरा |
बिहारमध्ये दुधाचं उत्पन्न भरपूर होते. घरोघरी संकरीत गायी दिसत होत्या. दूध उत्पादक शेतकरी दूध संकलन केंद्रावर दूध पुरवठा कमी करतात. परंतु दुधापासून बनवत असलेल्या पदार्थांसाठी भरपूर दूध राखून ठेवतात. दररोजच्या जेवणात सहजपणे रसगुल्ले खायला मिळत. तूप, गुलाबजामून, दही, लस्सी, पेढे, आणि मिठाई इकडच्यापेक्षा स्वस्त होते. आपल्याकडे सहजपणे मिळणाऱ्या वडापावची जागा तिकडचा रसगुल्ला व लिट्टी चोखा (कचोरी सारखा पदार्थ परंतु दाळीऐवजी फुटाण्याचे पीठ आणि त्यात स्वादिष्ट मसाला व त्यासोबत छोले पातळ भाजी) भरवून काढत होता.
मुक्कामाच्या घरी आणि 10 वर्षांची निसा -
ज्या ठिकाणी पाच-सहा दिवस राहायला संधी मिळाली. ते भूमिहार उच्चवर्गातील घर होते. कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषाची घरावर सत्ता होती. सलग दोन पंचवार्षिक पंचायत समिती सदस्य राहिल्यानंतर यावेळी त्या प्रमुखाने महिलांसाठीच्या राखीव जागेतून स्वपत्नीला जिंकून आणलं. भावडांमध्ये १५-२० एक्कर जमीन आहे. घरी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं दुकान तसेच दोन ट्रॅक्टर एक जेसीबी. दोन मुले त्यातील एक सरकारी नोकर, पत्नी, सून, दोन जुळ्या नाती व एक घरकाम आणि लहान मूल सांभाळण्यासाठी असलेली दहा वर्षांनी 'निसा'. ज्यावेळी आम्ही घरी असायचो. त्यावेळी ही निसा काहीना काही करत असायचीच. इकडची वस्तू तिकडे ठेवणे, पाणी आणून देणे, काखेत घेऊन बाळाला सांभाळत बसणे व आम्ही जेवायला बसलो तर जेवण आणून देणे अशी काम निसा करत होती. थोडा कानोसा घेऊन घरचं कुणी नसताना निसाला एके दिवशी विचारलं, निसा तू शाळेत जातेस का? घरी कोण कोण असत? तुझं गाव कोणतं? शिकायला आवडत का? इथले लोक तुला त्रास देतात का? वातावरण बघून मी असे बरेच प्रश्न निसाला विचारले. पण तिने खुलून उत्तरे दिली नाहीत. लाजत होती व नुसती मान हलवून हो नाही म्हणायची. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी आठ वाजता निसा जेव्हा नाष्टा घेऊन आली तेव्हा तिला अजून तेच प्रश्न विचारण्याचा यशस्वी प्रयत्न केला. सुरुवातीला तिला विचारलं तू नाष्टा केलास का? आमच्यासोबत नाष्टा कर! आईचा फोन येतो का? असे काही प्रश्न विचारल्यानंतर निसा आता बोलायला लागली. आणि तिने बऱ्याच प्रश्नांची उत्तरे दिली. कुटुंबप्रमुख अश्विनीकुमार सिंह यांना मुद्दामून निसाबद्दल विचारलं, तर त्यांनी सांगितलं "निसा ही माझ्या सुनेच्या माहेरची दलित कुटुंबातील मुलगी आहे. त्यांची परिस्थिती बिकट आहे. तिचे आई वडील बेंग्लोरला मजुरी करतात. तिला ते शिकवू शकत नाहीत. आम्ही तिला महिन्याचे एक हजार रुपये देतो , कपडे व खाऊ पिऊ घालतो. शाळेत पाठवत नाहीत पण घरीच शिकविण्याचा प्रयत्न करतो." कुटुंब प्रमुखाने सांगितलेली माहिती व स्वतः निसाने सांगितलेली माहिती ही सारखीच होती. परंतु त्यातील भाव वेगळे होते. निसाला खूप शिकण्याची ओढ, आई वडिलांना भेटण्याची इच्छा दिसत होती तर त्या कुटुंबप्रमुखाची उपकार करत असल्याची भावना त्याच्या बोलण्यातून जाणवत होती.
 |
| मुक्कामाचं घर |
कुटुंब प्रमुखाची एक मुलगी होती. तीच नाव खुशबू. खूशबुचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होत. एका छोट्या उद्योजकाच्या घरी ती नांदत आहे. खूप सुंदर बोलते, हुशार आहे, एम.ए. बीएड शिक्षण पूर्ण झालंय तीच. मुलींसाठी स्वातंत्र्य, शिक्षण किती महत्वाचं आहे उदाहरणादाखल सांगत होती. दिसायला फार सुंदर नव्हती व तिला अजून मूल झालेलं नव्हतं! खुशबू सांगत होती, "माझे पती मला कधीच भांडत नाहीत, हेवादेवा करत नाहीत. परंतु सासूबाई माझ्या दिसण्यावरून अक्षरशः रडायला लावतात. आता तर त्यांनी आम्हाला वेगळं टाकलंय. अन आम्ही आमच्या स्वतःच्या जीवावर फ्लॅट घेऊन वेगळे राहतो. तसच मूल न होण्याच्या कारणावरून माझे वडील मला कधीच भेटायला आलेले नाहीत. गरज वाटली तर मीच संध्याकाळी माहेरी येऊन दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी निघून जाते." मी ज्यावेळी खुशबुला विचारले की,'तुझे वडील का भेटत नाहीत तुला? कारण माहेरी येऊन तर तू भेटतच की त्यांना.' तर ती म्हणाली 'तशी प्रथा आहे. जोवर मुलीला मूल होत नाही तोवर मुलीच्या वडिलांनी नातवाला भेटायला जायचं नाही.'
ज्या स्त्रिया शेतात काम करत नाहीत व फक्त घरकाम सांभाळतात त्या स्त्रिया बहुतेक उच्च वर्गातील
(भूमिहार, ब्राह्मण) आहेत. त्या महिला 'चूल आणि मूल' मानसिकतेतच जगत आहेत. खुशबू जर उदारमतवादी वाटली तिचे प्रोग्रेसिव्ह विचार होते. माणसाच्या दिसण्यावर काही नसतं त्याच्या कामावर सगळं काही अवलंबून असतं. तिने मला सांगितलं की, आमच्यामध्ये खूप बंधन असतात. घराच्या बाहेर निघायचं नाही, पदर घ्यायचा, घरात परका कोणी आला तर त्याला दिसायचं नाही. ओहह तर आता माझ्या लक्षात आलं होतं की या घरातील स्त्रिया इकडे सहा दिवस राहूनही कधीच का बाहेर दिसत नव्हत्या! पण दलित कुटुंबामध्ये वेगळं चित्र होत. या कुटुंबातील स्त्रिया सकाळी लवकर उठून दुसऱ्याच्या शेतात मजुरीसाठी किंवा स्वतःच्या शेतात काम करण्यासाठी जातात ऊन ऊन होण्याआगोदर घरी येऊन उघड्यावरच आडाचं
(विहीर) पाणी पोहऱ्याने उपसून साडीसहित अंघोळ करताना आम्हाला दिसल्या. आणि हा सगळा प्रकार माझ्या लक्षात आला.
सार्वजनिक वाहतूक फाट्यावर -
 |
| गंतव्यस्थानी जाण्यासाठी बस तयार |
पहाट झाली तेव्हा बिहारमध्ये दानापूर या लोकांनी गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर आम्ही उतरलो. लोकांच्या गर्दी, गोंगाटाला पार करून आम्ही रिक्षा उभ्या होत्या तिथं आलो. आमचा चमू त्यातील एका रिक्षामध्ये स्थानापन्न झाला. आम्ही प्रवाशी गंगा नदीवरील 'जयप्रकाश नारायण सेतू'वरून चाललो होतो. सोबत असलेला सीआरपीएफचा जवान जेपी सेतूविषयी माहिती सांगत होता," हा सेतू बांधल्यापासून लोकांनी अक्षरशः सुटकेचा श्वास सोडला आहे. नाहीतर 'महात्मा गांधी सेतूने' गंगा नदी ओलांडायची म्हणजे जीव मुठीत धरूनच. जवळपास एक ते दीड तास कालावधी सेतू ओलांडायला लागायचा. जेपी सेतूमुळे हाच प्रवास आता पंधरा मिनिटांत होतो." बिहारमध्ये आमच्या आगमनाची सुरुवातच दम देणे, खडसावणे असल्या प्रकारांनी झाली होती. सोबत असलेला जवान प्रवासाला सुरुवात झाल्यापासून त्या ड्रायव्हरला दम देत होता. 'चलतोस की नाही लवकर की करू तुझी गाडी रिकामी' असं म्हणत असताना दोन चार बिहारी शिव्या ही हासडत होता. लवकर निघण्याच्या घाईमुळे तो तसं बोलत होता. जेपी सेतू ओलांडल्यानंतर आता थोडं थोडं उजाडलं होत. वाटेतच एक गाव लागलं. गावाच्या बाहेर पडल्याबरोबर बिनधास्तपणे खुर्ची टाकून बसलेल्या एका व्यक्तीने आमची गाडी अडवली! ड्रायव्हरने खिशातून पैसे काढून मुकाट्याने त्या व्यक्तीला वीस रुपये देऊन टाकले. व पुढे जाण्यासाठी त्याने आम्हाला परवानगी दिली. सोबत असलेल्या जवानाला हा काय प्रकार असल्याचे विचारले असता, तो म्हणाला आपापल्या भागात असे टोल वसूल करणारे बसलेले असतात. हा सगळा आमच्यासाठी अनोखा प्रकार होता.
बिहारमध्ये सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था नसून पूर्णपणे खाजगी वाहतूक व्यवस्था आहे. बेगूसराय ते पटना किंवा इतर कुठल्याही दोन शहरांमधील होणाऱ्या प्रवासाची सुविधा स्थानिक खाजगी बस कंपन्यांकडून पुरवली जाते. एके दिवशी समस्तीपुरहून बेगूसरायला जायचे होते बस थांब्यावर गाडीची वाट पाहत बसलो होतो. बऱ्याच वेळानंतर एक बस आली परंतु, प्रवाशांनी संपूर्ण भरलेली. आणि काही प्रवाशी तर बसच्या छतावर पण बसलेली होती. मला कंडक्टर म्हटला जल्दी गाड़ी में बैठो. मी म्हणालो कहा बैठु? तो म्हणाला, ऊपर छत पे! मी आश्र्चर्य चकितच झालो! अन नाईलाजाने बसच्या छतावर बसलो. प्रवास सुरु झाला एका वेगळ्या मूड मध्ये नवीन लोकांसोबत 'स्टेट हायवे-५५' या मार्गावरून...
बिहारमधील वाहन चालकांची गाडी चालवण्याची पद्धत म्हणजे बेशिस्तपणाचा कळसच होता. गाडीचा वेग एवढा सुसाट की छतावरचे प्रवाशी पडतील की काय अशी भीती वाटायची. राज्यमार्ग परंतु दुभाजकाचा थांगपत्ता नाही. प्रत्येक ओव्हरटेक म्हणजे स्टंटच. आपल्या इकडे कट मारला तर अख्खं गाव जागं करतात.पण इकडे लोकांना सवय झालीय. त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टीं किरकोळच होत्या. छोटछोट्या गावांमध्येसुद्धा वेग मर्यादेच्या पाट्या लिहिलेल्या बघायला मिळत होत्या.
खेड्यातील
ठेवणं -
बेगूसराय जिल्यातील चकवा या खेडेगावात आम्ही फिरत होतो. हायवेच्या दुतर्फा हे गाव वसलेले आहे. गावात प्रवेश केल्यानंतर सुसज्ज असे सिमेंट काँक्रीटचे रस्ते बघायला मिळाले. प्रत्येक पन्नास मीटरवर कोरडा आड(विहीर) होता. ७-८ पुरुष खोल असलेल्या आडामध्ये अगदी तळाला हिरव्या रंगाचं पाणी होतं. परंतु काही आडांमध्ये स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी होतं. काही आड तर घराच्या भिंतीलाच लागून होते. ना त्याच्यावर जाळी ना लोखंडी गज अशी कुठलीच सुरक्षेची व्यवस्था नव्हती. शेजारीच लहान मूल गोट्या खेळत बसले होते. एक छोटा मुलगा तर आडाच्या भिंतीवरच बसून काहीतरी खात बसले होता.
 |
| आड |
आम्ही आश्चर्यपूर्वक त्या मुलाच्या आईला प्रश्न विचारला,"हा आड किती खोल आहे? लहान मुलांना आडात पडण्याचा धोखा पण खूप आहे! तुम्ही काळजी का घेत नाहीत?" त्या म्हणाल्या "सवय झालीय आम्हाला असा अपघात आजपर्यंत कधी घडलेला नाही."
अंधश्रद्धा -
 |
| नजर न लागण्यासाठी बाहुलीचा वापर |
आम्ही फिरत होतो त्या परिसरातील तुरळक घरे अशी होती की त्या घरांना प्लास्टर केललं होतं. नाहीतर सरसकट कौलापासून व वितापासून बनवलेली घरे होती. असच एका घराचं बांधकाम चालू होतं, घरासोमर एक बुजगाउन उभा केलं होतं. त्या बुजगावण्याच्या पायात खेळाचे बूट, शर्ट, पॅन्ट आणि काळ्या रंगाचं तोंड व त्यावर कान, नाक चुन्याने रेखाटले होते. अशा प्रकारे आधुनिक पद्धतीचा पेहराव केलेला होता. घरमालक सांगत होता, कुणाची नजर लागू नये म्हणून घराचं काम सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत ही आकृती उभा असते.